दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा कार्यक्रम अर्थात “घन अमृताचा” ही भक्तिमय मैफिल संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री नऊ ते अकरा या कालावधीत होणार आहे असे कार्यक्रमाचे संयोजक हभप.प्रा.गोरक्षनाथ महाराज उदागे यांनी यावेळी सांगितले.
ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात मंगळवार दि.०३ जानेवारी रोजी सायं. ०६ वाजता हभप महंत शिवाजी महाराज देशमुख यांच्या सुश्राव्य वाणीतून किर्तन सेवा होणार आहे. बुधवार दि.०४ रोजी सकाळी ०९ वाजता हभप श्रीराम महाराज झिंजुर्के यांचे कीर्तन सेवा तसेच सायं.०५ वाजता हभप.प्रा.गोरक्षनाथ महाराज उदागे लिखित “निबन्धरत्नावली” या संस्कृत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हभप मारुती महाराज कुऱ्हेकर आणि इतर हभप महाराज मंडळींच्या हस्ते करण्यात येणार आहे, सायं ०६ वाजता हभप प्रा.गोरक्षनाथ महाराज उदागे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे आणि रात्री ०९ ते ११ या वेळेत सा.रे.ग.म.प. विजेती कु.अंजली गायकवाड आणि संगीत सम्राट विजेती नंदीनी गायकवाड या दोन भगिनींच्या आवाजात अभंगवाणी सादर होणार आहे. गुरुवार दि.०५ रोजी सकाळी ०९ वाजता वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) यांच्या काल्याच्या किर्तनाने ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवाची सांगता होणार आहे. सदर तपःपूर्ति महोत्सवाला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनीचे आजी-माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभणार आहे असे ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवाचे मुख्य संयोजक हभप प्रा.गोरक्षनाथ उदागे यांनी सांगितले आहे.