डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती,सावली तर्फे सम्राट अशोका विजयादशमी कार्यक्रम संपन्न.. — सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास विशेष मानवंदना…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

          आज सावली शहरात सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती सावली आणि सावली तालुका समता सैनिक दलातर्फे ध्वजारोहण व मानवंदनेचा कार्यक्रम राबविण्यात आला‌.

             सम्राट अशोक हे भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते.त्यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ – इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता.

           आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण,पाकिस्तान,पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ,भूतान इराण,ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.

        सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत.कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला,आपल्या सैन्याचे रक्तरंजित व हाहाकार बघता ते अस्वस्थ झाले होते व त्यांनी तलवारिचा त्याग करून तथागत गौतम बुद्ध यांना शरण गेले व दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्यातील जनतेसोबत कोणावरही बळजबरी न करता बौद्ध धर्माचे चक्र संपूर्ण जगात फिरविले.याचबरोबर सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन घडवून बौद्ध धम्माला पुनुरुजिवन केले होते.

        आज सम्राट अशोका विजयादशमीच्या पावन पर्वावर जेष्ठ बौद्ध समाज बांधव यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

           सावली तालुका समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजास व महान सम्राट अशोक तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस मानवानंदना देण्यात आली आणि विंग कमांडर यांच्या कडून उपस्थित बौद्ध समाज बांधव यांना भारतीय संविधान व देशासाठी समर्पित राहण्यासाठी शपथ देण्यात आली.

            याप्रसंगी बौद्ध समाज बांधव उपासक व उपासिका जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.